Ruth 3

1आणि तिची सासू नामी तिला म्हणाली, माझ्या मुली तुझे चांगले होऊन तुला विसाव्यासाठी एखादे स्थळ मिळावे म्हणून मला शोध करावयास नको काय? 2तर हे पाहा, ज्याच्या नोकराणीबरोबर तू राहिलीस तो बवाज आपला नातलग नव्हे काय? तो आज रात्री खळ्यात सातू उफणणार आहे.

3तर तू शुध्द होऊन, सुगंधीत तेल लावून, वस्त्र बदलून खळ्यात जा, पण त्याचे खाणेपिणे संपेपर्यत तू त्याच्या नजरेस पडू नको. 4तो कोठे निजतो ते पाहून ठेव आणि तो निजला म्हणजे तू जाऊन त्याच्या पायावरचे पांघरून काढून तेथे निजून राहा. मग काय करावयाचे ते तोच तुला सांगेल. 5ती म्हणाली, तुम्ही सांगता ते सर्व मी करीन.

6तिने खळ्यात गेल्यावर आपल्या सासूच्या सांगण्याप्रमाणे केले. 7खाणेपिणे झाल्यावर त्याचे मन प्रसन्न होऊन तो जाऊन धान्याच्या राशीच्या बाजूला झोपला. मग ती गपचूप जाऊन बवाजाच्या पायावरचे पांघरून काढून तेथे झोपली.

8मग मध्यरात्र झाल्यावर तो दचकून जागा झाला आणि वर डोके करून पाहतो तो आपल्या पायापाशी कोणी स्री झोपलेली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. 9तेव्हा तो तिला म्हणाला, तू कोण आहेस? ती म्हणाली, मी आपली दासी रूथ आहे, या आपल्या दासीला आपल्या पांघरूणाखाली घ्या. कारण आमचे वतन सोडविण्याचा अधिकार आपल्याला आहे.

10तो म्हणाला, मुली, परमेश्वर तुझे कल्याण करो, तू पहिल्यापेक्षा दुसऱ्या खेपेस अधिक प्रेमळपणा दाखविलास. कारण धनवान किंवा गरीब अशा कोणत्याही तुरुणाच्यामागे तू गेली नाहीस. 11तर मुली भिऊ नकोस, तू म्हणतेस तसे मी तुझ्यासंबंधाने करतो. कारण माझ्या गावच्या सर्व लोकांना माहित आहे की तू सदगुणी स्री आहेस.

12मी तुझे वतन सोडवावयास जवळचा नातलग आहे खरा, तथापि माझ्याहूनही जवळचा आणखी एक नातलग आहे. 13तू रात्रभर येथे राहा, आणि सकाळी तो तुजसंबंधाने नातलगाचे काम करण्यास तयार झाला तर बरेच आहे. त्याला ते करू दे. पण तुझ्यासंबंधाने नातलगाचे काम करण्यास तयार झाला नाहीतर, परमेश्वराच्या जिवीताची शपथ, ते मी करीन. सकाळपर्यत झोपून राहा.

14ती त्याच्या पायाशी झोपून राहिली, आणि मग माणूस माणसाला ओळखेल इतके उजाडेल त्याच्या अगोदर उठली, कारण बवाजाने तिला सांगितले होते की खळ्यात कोणी स्री आली होती हे कोणाला कळता कामा नये. 15तो तिला म्हणाला, तुझ्या अंगावरची चादर आणून पसरून धर. तिने ती पसरल्यावर त्याने सहा मापे सातू मोजून तिच्या पदरात टाकले व तिच्या खांद्यावर ठेवले. मग तो गावात गेला.

16सासूकडे ती आली तेव्हा ती तिला म्हणाली, माझ्या मुली, कसे काय झाले? तेव्हा त्या माणसाने कायकाय केले ते तिने तिला सगळे सांगितले. 17तिने सांगितले की सहा मापे सातू त्याने मला दिले. तो म्हणाला, आपल्या सासूकडे रिकाम्या हाताने जाऊ नको. ती म्हणाली, मुली, या गोष्टींचा कसा काय परिणाम होतो हे समजेपर्यत तू स्वस्थ राहा. कारण आज तो मनुष्य ह्या गोष्टीचा शेवट लावल्याशिवाय राहावयाचा नाही.

18

Copyright information for MarULB